मुंबई : बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग संघाने ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांची प्रभावी कमाई करत राज्याचा झेंडा उंचावला. विशेष म्हणजे, मुलींच्या गटात महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद आणि मुलांच्या गटात सांघिक उपविजेतेपद पटकावून एकूण वर्चस्व सिद्ध केले. साईराज परदेशी (३ राष्ट्रीय विक्रमांसह), अस्मिता ढोणे (२ राष्ट्रीय विक्रमांसह), यश खंडागळे, तनुजा पोळ आणि आकांक्षा व्यवहारे यांनी सुवर्णपदक पटकावली. आनंदी सांगळे व ग्रीष्मा थोरात यांनी रौप्य, तर पूजा ठेपेकर व वेदिका टोळे यांनी कांस्यपदक मिळवले.
अन्य सहभागी खेळाडू: शिवतेज पवार, मित घोडे, पृथ्वीराज चव्हाण, पियुष महाजन, दर्शन दोडामणी, सम्यक कांबळे, साध्वी चौधरी, अनुष्का करंजकर, श्रावणी जाधव, ईश्वरी पोवार, निशिगंधा कडोले, जिया पट्टेकरी, नेत्रा थोरात, समृद्धी ढोणे. या संघाचे व्यवस्थापन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड व राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांनी पाहिले. प्रशिक्षक म्हणून छत्रे हायस्कूल मनमाड चे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला माने यांचे तर सहाय्यक मार्गदर्शक म्हणून वसीम सय्यद व दत्तात्रय टोळे यांचे मोलाचे योगदान लाभले.