डेहराडून : उत्तराखंडच्या केदारनाथ धामला जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना आज, शनिवारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. हेलिकॉप्टर वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात होते. यासंदर्भातील माहितीनुसार अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे हेलिकॉप्टर होते जे एम्स, ऋषिकेश येथून केदारनाथसाठी उड्डाण करत होते. त्यात दोन डॉक्टर आणि एक पायलट होता. केदारनाथ हेलिपॅडच्या २० मीटर आधी हेलिकॉप्टर कोसळले. तिन्ही जण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी बद्रीनाथ धाम येथे एका हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. यंदा मे महिन्यात आतापर्यंत हेलिकॉप्टर अपघाताच्या ३ घटना घडल्या आहेत, यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ६ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. तर, बद्रीनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आपत्कालीन लँडिंगमध्ये यात्रेकरू थोडक्यात बचावले. बद्रीनाथहून चमोली जिल्ह्यातील शेरसी येथे परतणाऱ्या हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे रैनका उखीमठ येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.