पाकिस्तान स्वर्ण मंदिराला लक्ष्य करणार होता, सैन्याच्या एअर डिफेन्स युनिटने केला खुलासा

0

चंदीगड : ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने हवाई हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. ऑपरेशनच्या तीन दिवसांत पाकिस्तान लष्कर भारतीय कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसवर निशाणा साधू शकला नाही, त्यामुळे त्यांनी सुवर्ण मंदिराकडे क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने या क्षेपणास्त्रांना आकाशातच निष्क्रिय केल्याचा गौप्यस्फोट भारतीय सैन्याने केला आहे.

पंजाबमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या एअर डिफेन्स युनिटचे मेजर कार्तिक सी यांनी सांगितले की, हल्ल्यात अपयश आल्यावर पाकिस्तान लष्कराने सामान्य नागरिकांना लक्ष्य करायला सुरुवात केली होती. भारताने ६ व ७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असून, त्यानंतर दोन्ही बाजूंनी हल्ले थांबले आहेत. पण ऑपरेशन सिंदूर हे फक्त स्थगित करण्यात आले आहे, समाप्त नाही. सेनेच्या १५ इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्रि यांनी सांगितले की, ७ मे २०२५ रोजी आपण पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तर दिले जाईल आणि ते लष्करी ठिकाणांना लक्ष्य करतील, यासाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. आपल्याकडील विविध प्रकारचे रडार आणि एअर डिफेन्स सिस्टम सज्ज होते, असे त्यांनी म्हटले.

लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “एअर स्ट्राइकनंतर सलग तीन दिवस पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रत्येक हल्ले आम्ही अपयशी ठरवले. जेव्हा पाकिस्तानी लष्कराला यश मिळत नव्हते, तेव्हा त्यांनी ड्रोन आणि रॉकेटच्या माध्यमातून नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. तसेच नागरी भागांवर हल्ले करत असताना, आम्हाला सर्वाधिक आश्चर्य हे पाहून वाटले की पाकिस्तानी लष्कर अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करत होते. पाकिस्तानने सुवर्ण मंदिराकडे एयर टू सर्फेस आणि सर्फेस टू सर्फेस अशा दोन प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा मारा केला. याशिवाय ड्रोन हल्ल्याचाही प्रयत्न केला. मात्र, सुवर्ण मंदिर हे फक्त अमृतसरचे नाही, तर संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे आम्ही याच्या सुरक्षेसाठी आधीपासून सज्ज होतो. आम्ही त्यांचे सर्व हल्ले निष्फळ ठरवले.

पाकिस्तानच्या सर्व एअर रेड्स भारताने पूर्णपणे निष्फळ ठरवल्या. या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळाला. आमच्या तयारीची पातळी तुम्ही यावरून समजू शकता की, आमच्या एअरबेस वेपन्स आणि लष्करी शस्त्रास्त्रांपैकी केवळ १० टक्के शस्त्रास्त्रांचाच वापर केला. आम्ही ज्या ड्रोन आणि मायक्रो ड्रोनना पाडले, ते सर्व तुर्कस्तानात तयार करण्यात आलेले होते, असेही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech