जयपूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव दिसून आला. भारताने मोठी कारवाई केलीया काळात अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनी भारताविरुद्ध गरळ ओकली. त्यामुळेच आता भारताकडून जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मोठी कारवाई करण्यात आली.जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममधील ‘वॉल ऑफ ग्लोरी’वरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत.
जयपूरमधील सवाई मानसिंग या मैदानावर खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे फोटो सवाई मानसिंग स्टेडियममध्ये लावण्यात येतात. पाकिस्तानने येथे एक कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यामुळे एकूण २५ पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो ‘वॉल ऑफ ग्लोरी’चा भाग होते. पण राजस्थान क्रिकेट असोसिएशनने (आरसीए) सर्व पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी दर्शवते.
असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्यात आले होते. या २५ खेळाडूंमध्ये पाकिस्तानकडून खेळणारा शेवटचा हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाचाही समावेश आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दानिश कनेरियाने पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर उघडपणे टीका केली होती. यासोबतच त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो असा आरोपही केला होता. तरीही पाकिस्तानी संघाचा भाग असल्याने त्याचाही फोटो हटवण्यात आला.