पुणे : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. तसेच डॉ. नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. डॉ. नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात त्याची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आले. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले. खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला.
वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती. पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.