‘शातिर द बिगिनिंग’ चित्रपट २३ मे ऐवजी १३ जूनला होणार प्रदर्शित

0

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट निर्माण होत असतात. म्हणजे प्रत्येक आठवड्याला किमान दोन मराठी चित्रपट येणार हे निश्चित आहे.अशातच आता २३ मे रोजी तर तब्बल सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होते. ही मराठी चित्रपटांची अनियंत्रित स्पर्धा टाळण्यासाठी ‘शातिर द बिगिनिंग’च्या निर्मात्यानी एक पाऊल मागे टाकले असून आता १३ जून रोजी त्याचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या बद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर द बिगिनिंग हा माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. २३ मे रोजी आम्ही चित्रपट रिलीज करणार होतो.मात्र, ऐनवेळी काही निर्मात्यांनी याच दिवशी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटाची गाणी, ट्रेलर याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपट प्रदर्शनासाठीची आमची संपूर्ण तयारी झालेली आहे, परंतु एकाच वेळी सात मराठी चित्रपट नको म्हणून आम्ही आमचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट महामंडळाने एखादी समिती तयार करून एका वेळी दोन किंवा तीन पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण एका वेळी ५-७ मराठी चित्रपट आले तर कुणालाही प्रेक्षक मिळणार नाही आणि पर्यायाने निर्माते म्हणजेच पर्यायाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला याची झळ बसणार आहे. शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे. चित्रपटाच्या पोरी आम्ही मराठी पोरी…. या गाण्याप्रमाणेच टीजर आणि ट्रेलरला मराठी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.

सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातीर, द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. शातिर द बिगिनिंग या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech