नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर राबवताना भारतीय वायु दलाचे किती नुकसान झाले, असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी सैन्याचे मनोबल कमी करीत असल्याची टीका भाजपने केली. दरम्यान, पुन्हा एकदा भाजपने राहुल गांधींचा उल्लेख ‘निशान-ए-पाकिस्तान’ असा केला. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आज, शुक्रवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार भाटिया म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी काहीही विधाने करत आहेत. ते विचारत आहेत की भारतीय वायु दलाचे किती नुकसान झाले. गेल्या ११ मे रोजी पत्रकार परिषदेत एअर मार्शल भारती म्हणाले की, ‘आपण युद्धाच्या परिस्थितीत आहोत, त्या प्रश्नाचे उत्तर देणे आपल्यासाठी शहाणपणाचे नाही’, मात्र तरीही राहुल गांधी भारतीय सैन्याचे मनोबल कसे कमकुवत करायचे यावर चर्चा करण्यात व्यस्त असल्याची टीका भाटिया यांनी केली. भारताने ६ आणि ७ मे रोजी रात्री तसेच ९ तारखेला केलेल्या कारवाईत पाकिस्तानला मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्तानच्या नेत्या मरियम नवाज यांनी कबुल केले आहे. पाकिस्तानाती नेते भारताची कारवाई मोठी मानत असताना राहुल गांधी मात्र चुकीचे प्रश्न उपस्थित करत असल्याचे भाटिया म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधींना निशान-ए-पाकिस्तान म्हणत टोला लगावला.