टीका-आरोपांना कामातून उत्तर दिल्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो

0

*शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

*माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण

*नाशिक आणि मुंबईतील उबाठा गटाला जोरदार झटका

*उबाठा गटाच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील उबाठा नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. मुक्तागिरी निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशीरा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळेंसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

येवला येथील माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह डॉ.सुधीर जाधव, उत्तमराव आहेर, अजय जैन, दयानंद जावळे, नगरसेवक अंबादास कस्तुरे यांच्यासह उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच कुलाबा विधानसभेतील मुंबई महापालिका स्थायी समिती सदस्या उबाठा नगरसेविका सुजाता सानप, उबाठाचे कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप, जगदिश मथणे, अनिल वाळुंज, शरद वाघ, अभिषेक वाघ, फैजल कुरेशी, शुभम पेढांबकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे नाशिक आणि मुंबईत उबाठा गटाला जोरदार झटका बसला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्ष सरकारने जे काम केलं ते जनतेने पाहिले. शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहे. त्यामुळे राज्यातून आणि राज्याच्या बाहेरुन देखील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर काहीजण म्हणाले होते तुमच्यासोबत गेलेला एकही आमदार निवडून येणार नाही, पण विधानसभा निवडणुकीत ५० चे ६० आमदार झाले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे काम तुम्ही केले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. राज्यातील जनतेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचीच खरी शिवसेना आहे यावर शिक्कामोर्तब केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दराडे बंधु शिवसेनेत असल्याने येवल्यातील पाण्याचा प्रश्न, येवेला नगरपरिषद आणि एमआयडीसी संदर्भातील प्रश्न सोडवू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नाशिकमध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे काम करत आहेत. लवकरच नाशिकमध्ये एक मोठा मेळावा घेऊ, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सुजाता सानप आणि गणेश सानप यांनी सुचवलेली विकास कामे पूर्ण करु, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेतील उबाठाचे जवळपास ६५ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिळून नगरसेवकांची मोठी फौज शिवसेनेत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, ती टप्प्याटप्याने पूर्ण करणार, असे ते म्हणाले. विरोधी पक्षाने कितीही टीका केली तर लाडकी बहिणी योजना, शेतकऱ्यांशी संबधित योजना बंद होणार नाहीत, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुखपदी आमदार किशोर दराडे 

शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या राज्य प्रमुख पदी आमदार किशोर दराडे यांच्या निवडीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी यावेळी केली. राज्यभरातून शिक्षक सेनेचे एक लाखांहून अधिक सदस्य करणार, असा निर्धार आमदार किशोर दराडे यांनी यावेळी केला. नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेचे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरु करु आणि जास्तीत जास्त सभासद नोंदणी करणार असल्याचे आमदार किशोर दराडे म्हणाले.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech