“ऑपरेशन सिंदूर”च्या यशस्वीतेसाठी एकनाथ शिंदेंनी एनडीए बैठकीत मांडला गौरवाचा ठराव

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या आज नवी दिल्लीत झालेल्या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी “ऑपरेशन सिंदूर”च्या अभूतपूर्व यशाबद्दल एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला.या ठरावात भारताच्या संरक्षण दलांच्या शौर्यपूर्ण कारवायांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, धैर्यशील आणि राष्ट्रहिताचे नेतृत्व यांचे विशेष कौतुक करण्यात आले. सर्व उपस्थित एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांनी या ठरावाला एकमताने पाठिंबा दिला.

ठरावात “ऑपरेशन सिंदूर”द्वारे संरक्षण दलांनी दाखवलेले अत्युच्च धैर्य, युद्धनीतीचे कौशल्य आणि राष्ट्रासाठी समर्पण, सीमापार दहशतवाद्यांना दिलेला स्पष्ट आणि निर्णायक संदेश, भारताच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेला सर्वोच्च मानणारी एनडीए सरकारची निष्ठा, मोदी सरकारच्या कार्यकाळात संरक्षण दलांसाठी झालेली ऐतिहासिक सुधारणा — वन रँक वन पेंशन, स्वदेशीकरण, सीमेवरील पायाभूत सुविधा, आणि तंत्रसुसज्जता आणि “भारत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देईल आणि तेही भारताच्या अटींवरच,” या न्यू नॅरॅटिव्हचे समर्थन या महत्वाच्या मुद्यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी ठराव सादर करताना सांगितले, “ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक लष्करी अभियान नाही, तर तो भारताच्या राष्ट्रीय इच्छाशक्तीचा प्रतीक आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भारत प्रत्येक आव्हानाला निर्भीडपणे तोंड देत आहे. आज जगाला हे ठामपणे सांगणे आवश्यक आहे — जो भारताशी टकराव घेईल, त्याचा नामोनिशान नष्ट होईल. आपल्या संरक्षण दलांमध्ये जे सामर्थ्य आहे, ते भारताची अभेद्य सुरक्षा कवच आहे.” या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.  ठराव एनडीएच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत एकजुटीच्या बांधिलकीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वासाचे प्रतिक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech