नांदेड : आजचा भारत गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर देतो. पाकिस्तान विसरला आहे की १०-१५ वर्षांपूर्वी येथे काँग्रेसचे सरकार होते जे आता बदलले आहे. हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे की, भारतीय सैन्य, भारतीय सीमा आणि भारतातील लोकांना त्रास दिला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला आहे. नांदेड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण यांसह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरातमधून पाकिस्तानला इशारा दिला. तसेच अमित शाह यांनीही महाराष्ट्रातील नांदेड येथून पाकिस्तानला एकाच दिवशी इशारा दिला.
शाह म्हणाले की, जेव्हा त्यांनी उरीवर हल्ला केला तेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. जेव्हा त्यांनी पुलवामावर हल्ला केला, तेव्हा आम्ही हवाई हल्ला केला. जेव्हा त्यांनी पहलगामवर हल्ला केला तेव्हा आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवले आणि त्यांचे मुख्य लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले. आमच्या हवाई हल्ल्यात शेकडो दहशतवादी नष्ट झाले. मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आणि संपूर्ण जगाला संदेश दिला की, आपल्या आई-बहिणी-मुलींच्या कपाळावरचा सिंदूर स्वस्त नाही. जर कोणी तिच्या सिंदूरला इजा केली तर त्याला त्याच्या रक्ताने उत्तर द्यावे लागेल. ८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पण आपली हवाई संरक्षण प्रणाली इतकी मजबूत होती की त्यांचे एकही क्षेपणास्त्र, एकही ड्रोन भारतीय भूमीला स्पर्श करू शकले नाही, ते हवेतच नष्ट करण्यात आले. ९ मे रोजी ज्या पाकिस्तानी विमानतळांवरून आणि हवाई संरक्षण प्रणालींवरून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सोडण्यात आले होते ते आमच्या सैन्याच्या क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे नष्ट केले. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली पोकळ असल्याचे सिद्ध झाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाबाबत शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याची मागणी बऱ्याच काळापासून होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार महाराष्ट्राला देशात नंबर एक बनवण्यासाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदींनी २०४७ मध्ये विकसित भारत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, शिवाजी महाराजांची ही भूमी विकसित भारताच्या उभारणीत सर्वात मोठे योगदान देईल. महाराष्ट्र हे देशातील पहिले विकसित राज्य असेल आणि या माध्यमातून विकसित भारताची निर्मिती होईल.
३१ मार्च २०२६ पर्यंत देशाच्या भूमीवरून नक्षलवाद समाप्त करु असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. आमच्या आया बहिणींच्या माथ्यावरील सिंदूर स्वस्त नाही हे मोदीजींनी दाखवून दिले आहे. आपल्याला असा भारत बनवायचा आहे की, ज्याच्यासमोर कोणी डोळे वर करून बघणार नाही. ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी सर्व खासदारांना बोलावून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पर्दाफाश करण्याचं काम करावे असे सांगितले होते. तेव्हा उद्धव ठाकरे सेनेच्या एका प्रमुख नेत्याने सांगितले की, किसकी बारात जा रही है असं म्हटले होते. उद्धव सेनेच्या लोकांना काय झाले माहिती नाही. शरद पवार अनेक वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात राहिले. एकदाही काही केलं नाही, मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महाराष्ट्र भूमीचे मोठे योगदान असेल, असेही शाह म्हणाले.