ब्लॅक कार्बनमुळे वितळतेय हिमालयीन ग्लेशियर

0

नवी दिल्ली : ब्लॅक कार्बनमुळे हिमालयीन ग्लेशियर वितळण्याची गती वाढल्याची माहिती एका संशोधनातून पुढे आली आहे. गेल्या २० वर्षात हिमालयातील बर्फाच्या पृष्णभागाचे तापमान ४अंश सेल्सीअसने वाढले असून यासाठी ब्लॅक कार्बनचे उत्सर्जन कारणीभूत ठरले आहे.दिल्लीस्थित ‘क्लायमेट ट्रेंड्स’ या संशोधन संस्थेने नासाच्या उपग्रह डेटाचा वापर करून २००० ते २०२३ दरम्यान हिमालयीन ग्लेशियरवर काळ्या कार्बनचा प्रभाव तपासला. या अभ्यासाचा निष्कर्ष ‘इम्पॅक्ट ऑफ ब्लॅक कार्बन ऑन हिमालयन ग्लेशीयर २३ ईयर ट्रेंड अनॅलिसीस’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनानुसार २००० ते २०१९ दरम्यान काळ्या कार्बनच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली, तर २०१९ ते २०२३ दरम्यान त्यात स्थिरता दिसून आली आहे. हिमालयातील बर्फाच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान २०००-०९ दरम्यान उणे -११.२७ अंश होते, जे २०२०-२३ दरम्यान -७ .१३ अंशावर आले आहे. त्यामुळेच बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगवान होत आहे. संशोधनानुसार,ब्लॅक कार्बनचे कण बर्फाचा पृष्ठभाग काळा करतात, त्यामुळे त्याची परावर्तकता कमी होते व जास्त सूर्यप्रकाश शोषला जातो, परिणामी बर्फ लवकर वितळतो.

या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. पलक बाल्याने म्हणाल्या की, हिमालयातील बर्फ वितळत असून, त्याचा परिणाम २ अब्ज लोकांच्या पाण्याच्या स्रोतांवर होणार आहे. पूर्व हिमालयात ब्लॅक कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असून, हे क्षेत्र लोकवस्ती व बायोमास जळवणार्‍या भागांच्या जवळ असल्यामुळे अधिक प्रभावित आहे. ब्लॅक कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम थांबवायचे असतील तर स्वयंपाकाच्या शेगड्या, पीक जाळणे आणि वाहतूक यांसारख्या स्त्रोतांमधून काळ्या कार्बनचे उत्सर्जन कमी केल्यास, हवामान बदलावर झपाट्याने परिणाम करता येऊ शकतो असे क्लायमेट ट्रेंड्सच्या संचालिका आरती खोसला यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech