इंडि आघाडीच्या बैठकीला शरद पवार गैरहजर पंतप्रधानांना दिलेल्या पत्रावरही पवारांची स्वाक्षरी नाही

0

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडि आघाडाची आज, मंगळवारी दिल्लीत आयोजित बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अनुपस्थित होते. तसेच ऑपरेशन सिंदूर संदर्भात विरोधकांना पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रावरही पवारांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे पवार इंडि आघाडीपासून फारकत घेणार का..? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

इंडि आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटना लक्षात घेऊन संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणत्याही नेत्याची किंवा खासदाराची स्वाक्षरी नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळात परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी स्वतः विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, असे असूनही या पत्रावर त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याची स्वाक्षरी नसणे हा मुद्दा मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.

पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत इत्यादी १६ पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे अभिषेक बॅनर्जी हे परदेशात असतानाही त्यांची पत्रावर स्वाक्षरी आहे. याचीही चांगलीत चर्चा दिल्लीत आहे. दरम्यान, गेले काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का.. ? शरद पवार गटाची भूमिका नक्की काय असेल.. ? याबाबतही अनेक तर्क बांधले जात आहेत.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर इंडि आघाडी अस्तित्वात आहे का.. ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत मोठ्या कालावधीनंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यामुळे विरोधक एकत्र आहेत, हा संदेशही आघाडीला या निमित्ताने द्यायचा होता मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे विरोधकांच्या या प्रयत्नाला खीळ बसल्याचे चित्र आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech