चेन्नई : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून २५ हुन अधिक चाहते जखमी झाले आहेत.यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मंगळवारी(दि.३) झालेल्या आयपीएलच्या थरारक अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला. आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज(दि.४) बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या देखील वाढू शकते. तर यामध्ये २५ हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहितीनुसार, काही जखमींना शिवाजीनगर भागातील बॉवरिंग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे. स्टेडियम बाहेर ५० हजारांपेक्षा अधिक चाहत्यांची गर्दी झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक ३ जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती. स्टेडियमजवळचे रस्ते चाहत्यांच्या गर्दीनं जाम झाले होते. यामुळं मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. आरसीबीची विजेती टीम विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात दाखल होत असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे.