पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज – माजी आमदार नरेंद्र पवार

0

एल. डी. सोनावणे महाविद्यालयात वृक्षारोपण करत स्वीकारले झाडाचे पालकत्व

कल्याण :  पृथ्वीवरील बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. निमित्त होते ते जागतिक पर्यावरण दिनाचे आणि युवा कार्यकर्ता विवेक गायकर व बिर्ला कॉलेज महाविद्यालय याच्या वाढदिवसानिमित्त कल्याणातील सुप्रसिद्ध एल. डी. सोनावणे महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे.

यंदा १०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यात पडणारा पाऊस मे महिन्यातच बरसला. देशातील शास्त्रज्ञांच्या मते हे निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले लक्षण नसून निसर्ग यातून आपल्याला धोक्याचे संकेत देत आहे. मात्र या सर्वातून पुढच्या पिढीसाठी एक चांगले आयुष्य द्यायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे नरेंद्र पवार यांनी यावेळी अधोरेखित केले. तर वाढते वायू प्रदूषण आणि त्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक इंधनांचा प्रचंड वापर पाहता सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेली ही पारंपरिक ऊर्जा ही पुढील काही वर्षेच टिकू शकणार आहे. ते पाहता नविन अभ्यासानुसार या इंधन स्रोतांपेक्षा बांबूच्या झाडांमध्ये अधिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असल्याचे आढळून आल्याची माहिती पर्यावरण क्षेत्रात कार्यरत माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बांबूच्या या गुणधर्माच्या पार्श्वभूमीवर पालघरसारख्या ठिकाणी तब्बल 1 लाख एकरावर बांबूची लागवड करण्याचा संकल्प शासनाकडून करण्यात आला आहे. आजच्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या बांबू लागवडीच्या उपक्रमाला पालघरमध्ये प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच निसर्गाचा आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी बांबू लागवडीचा कार्यक्रम हा आम्ही अर्थ सेव्हर मिशन म्हणून स्विकारण्यात आला आहे. आणि जेणेकरून आपली पुढची पिढी जगण्यासाठी या मिशनमध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हावेच लागेल असे आवाहनही नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले.

नरेंद्र पवार यांनी वृक्षारोपण करत स्वीकारले झाडाचे पालकत्व…

दरम्यान आज असलेला जागतिक पर्यावरण दिनाचे आणि युवा कार्यकर्ता विवेक गायकर व बिर्ला महाविद्यालयातील जीएस खुशनूर खान यांच्या वाढदिवसानिमित्त एल. डी.सोनावणे महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही एक झाडाचे रोपटे लावून त्याचे आपण पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले. तसेच इतरांनीही आपापल्या झाडाचे पालकत्व स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी एल.डी.सोनावणे महाविद्यालयाच्या प्राचार्य ऍना अँथनी, भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील, विनोद राजपूत सर, विवेक गायकर, खुशनूर खान, गणेश मोटे, गिरीष ज्यूरियानी, किमया जुन्नरकर, पल्लवी पाटील, प्रथमेश पांजरी, जयेश जगदाने, यश निंबाळकर यांच्यासह महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व बिर्ला कॉलेज मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‎

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech