नांदेड एक्स्प्रेसमध्ये दरोडा, झटापटीत डॉक्टर दाम्पत्य जखमी

0

मुंबई : नांदेड विशेष एक्स्प्रेस ट्रेनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करून लुटीचा प्रयत्न केला आहे. या झटापटीत डॉ. दिपाली देशमुख ट्रेनमधून खाली पडल्या, तर त्यांना वाचवण्यासाठी पती डॉ. योगेश देशमुख यांनी उडी मारल्याने त्यांचा डावा हात तुटला आहे. ही घटना ६ जून रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली होती.

पनवेलमधील कामोठे येथे राहणारे देशमुख दाम्पत्य व त्यांची ९ वर्षांची मुलगी श्रद्धा हे नातेवाइकांकडे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथून एलटीटी-नांदेड विशेष ट्रेनच्या S-4 बोगीत प्रवास करत होते. झोपेत असताना एका अनोळखी व्यक्तीने डॉ. दिपाली यांच्या पर्सवर हात टाकला. त्यांनी प्रतिकार करताच चोरट्याने त्यांना चालत्या ट्रेनमधून खाली फेकले.

घटनेचा आवाज ऐकून वरच्या सीटवर झोपलेले डॉ. योगेश देशमुख जागे झाले. पत्नी खाली पडल्याचे पाहताच त्यांनीही ट्रेनमधून उडी मारली, ज्यात त्यांचा हात तुटला. घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला असून कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील ४ दिवसांत दुसरा रेल्वे दरोडा : या घटनेपूर्वी, २ जून रोजी जयपूर-बांद्रा एक्स्प्रेसमध्ये अंधेरीजवळ एका दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. चोरांनी ७ लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग पळवली होती. या प्रकरणात बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेतील सुरक्षेच्या दृष्टीने या घटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रेल्वे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech