सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तसेच ही आषाढी वारी स्वच्छतेची वारी होण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्र कायम स्वच्छ राहील, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. वारीपूर्वी पंढरपूर शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नदीपात्रातील होड्यांची नोंद घेऊन होडी मालक व चालकांचे नाव, आसन क्षमता निश्चित करून होडीत जास्त लोक बसणार नाहीत याची दक्षता घ्यावी. होडीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेटची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.