विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हावे – चंद्रकांत पाटील

0

मुंबई : देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकीय ज्ञान न देता प्रात्यक्षिकवर आधारित ज्ञान देणे गरजेचे आहे. ज्या देशामध्ये प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हायला पाहिजे, असे आवाहन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ विकास २०२५ पश्चिम क्षेत्र ‘ या एक दिवसीय परिषदेचे आयोजन मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहागीर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ निर्मलजीत सिंह कलसी, नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठाचे कुलगुरू राणा प्रताप सिंह, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष दीपक कुमार श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य एनईपी सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा नितीन करमळकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील म्हणाले, कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे. राज्यात उद्योगाला आवश्यक असलेले कौशल्य विकसित करणारे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्योग क्षेत्रातच तंत्रनिकेतनच्या माध्यमातून तरुणांना आवश्यकतेनुसार कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात येत आहे. राष्ट्रीय अप्रेंटिसिप प्रशिक्षण योजना आणि राज्यस्तरीय कौशल्य विकास या विविध उपक्रमांमधून यामध्ये काम करण्यात येत आहे.

नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानावर आधारित शिक्षण देण्यात येत आहे. देशातील बऱ्याच राज्यांनी राष्ट्रीय शिक्षण पद्धती लागू केली आहे. संशोधन वृत्तीला प्रोत्साहित करत जगाला हवे असलेले संशोधन करून त्यामधून संपन्नता आणण्याचे ध्येय नवीन शिक्षण पद्धतीत ठेवण्यात आले आहे, जगाला सध्या नवनवीन संशोधनाची गरज आहे आणि ही संशोधनाची भूक भारत भागवू शकतो. त्यामुळे विद्यापीठांनी संशोधनात्मक उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जगदीश कुमार यांनी यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमन दिव प्रदेशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू प्राध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech