पावसाळी वेळापत्रकामुळे १५ जूनपासून कोकण रेल्वेचा वेग कमी होणार

0

रत्नागिरी : पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. ते लक्षात घेऊन १५ जून ते २० ऑक्टोबर या कालावधीसाठी पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. या काळात गाड्यांचा वेग कमी होणार आहे. पावसाळ्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने सज्जता केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भू-सुरक्षा प्रकल्पांमुळे मार्गावरील दगड पडणे आणि माती घसरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असले तरी खबरदारी म्हणून पावसाळ्यात या मार्गावरील व्यत्यय कमी करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता या दृष्टीने कोकण रेल्वेने व्यापक कृती आराखडा कार्यान्वित केला आहे. या मार्गावरील संवेदनशील ठिकाणी चोवीस तास गस्त घालण्यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचारी तैनात राहणार आहेत. गाड्यांचा वेग ताशी ४० किमी कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवासी www.konkanrailway.com किंवा हेल्पलाइन क्रमांक १३९ द्वारे प्रत्यक्ष ट्रेनची स्थिती पाहू शकतील.

ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसह स्वयंचलित वैद्यकीय व्हॅन (एआरएमव्ही) रत्नागिरी आणि वेर्णा येथे, तसेच १५ मिनिटांत वाहतूक सुरू करण्यासाठी अपघात निवारण ट्रेन (ART) वेर्णा येथे तैनात आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगावमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. चिपळूण, रत्नागिरी, वेर्णा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके तैनात आहेत.लोको पायलट आणि गार्ड्सना वॉकी-टॉकी देण्यात आल्या आहेत. सर्व स्टेशन्समध्ये २५-वॅटचे व्हीएचएफ सेट आहेत. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांशी त्वरित संपर्क साधण्यासाठी दर एक किमी अंतरावर आपत्कालीन कम्युनिकेशन सॉकेट बसवले आहेत.

चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथे बीआरएन (वॅगन्स) बसवलेली उत्खनन यंत्रे तैनात आहेत. तसेच वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ ठिकाणी रेल्वे देखभाल वाहने (आरएमव्ही), तर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स आहेत.काळी नदी, सावित्री नदी आणि वशिष्ठी नदी या प्रमुख पुलांवर पूर इशारा प्रणाली कार्यरत आहेत. वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पानवल (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल (थिवी आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि माणकी दरम्यान) या चार ठिकाणी प्रमुख व्हायाडक्ट आणि पुलांवर ॲनिमोमीटर बसविले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech