पुणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे , आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक, ऊर्जा दक्षता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात दोन उद्दीष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी योजना असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात १०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. ३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजचे देयक शून्यावर यावे असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दीष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.