ठाणे : मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आज, सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गाडीमधून १३ जण खाली पडल्याची घटना घडली. यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य ९ जणांवर उपचार करण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणारी लोकल प्रवाशांनी भरगच्च भरली होती. प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाऊन दिशेला जाणारी एक लोकल समोरून आली. ज्या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या तिथे दोन रेल्वेरुळांमधील अंतर कमी आहे. त्यावेळी दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला आदळून दरवाजात उभे असलेले १३ प्रवासी खाली पडले.
लोकलच्या गार्डकडून घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही घायाळांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर काहींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेल्यांपैकी ५ पुरुष आणि २ महिलांची प्रकृती स्थिर आहे, २ जणांना मेंदू संबंधीत दुखापत झाल्यामुळे ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तसेच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
चार मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती
१) केतन दिलीप सरोज (पु, २३ वर्ष, रा. तानाजी नगर, उल्हासनगर)
२) राहुल संतोष गुप्ता (पु. २७ रा. दिवा)
३) विकी बाबासाहेब मुख्यदल (पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
४) मयुर शाह (पु, ५०)
नऊ जखमींची माहिती खालीलप्रमाणे
१) शिवा गवळी (पु, २३ वर्ष, रा. डायघर, कल्याण फाटा) प्रकृती चिंताजनक, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठवले)
२) आदेश भोईर (पु, २६ वर्ष, रा. आटगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
३) रिहान शेख (पु, २६ वर्ष, रा. भिवंडी, प्रकृती स्थिर, शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू
४) अनिल मोरे (पु. ४० वर्ष, प्रकृती चिंताजनक, उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविले)
५) तुषार भगत (पु, २२ वर्ष, रा. टिटवाळा, प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
६) मनीष सरोज (पु, २६ वर्ष, रा. दिवा साबेगाव, दिवा, प्रकृती स्थिर, शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
७) मच्छिंद्र गोतारणे (पु, ३९ वर्ष, रा. वाशिंद, प्रकृती स्थिर, शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
८) स्नेहा धोंडे (स्त्री, २१ वर्ष, रा. टिटवाळा, प्रकृती स्थिर, शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
९) प्रियंका भाटिया (स्त्री, २६ वर्ष, रा. शहाड, कल्याण, प्रकृती स्थिर, शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)