डोंबिवली : मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेली रेल्वे अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायी आहे. या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. भविष्यात अशाप्रकारच्या दुर्घटना कशा टाळता येतील, तसेच अपघातांची संख्या आटोक्यात कशी आणता येईल, यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी आ. निरंजन डावखरे, संजय वाघुले उपस्थित होते.
या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे जखमी नागरिकांना धीर दिला. तसेच रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांच्याशी संवाद साधून सुरू असणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. मृतांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींविषयी सहानुभूती असल्याचेही ते म्हणाले.