ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने त्वरित यंत्रणा कार्यान्वित केल्या. तर आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाला भेट देत जखमी प्रवाशांची विचारपूस केली.
महाजन यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “जखमींच्या उपचारात कोणतीही कसूर चालणार नाही. आवश्यक त्या सुविधा तातडीने द्याव्यात. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” त्यांनी जखमींच्या नातेवाईकांशीही संवाद साधून त्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात सांगितले की, “आपत्तीच्या वेळी सरकारची संवेदनशीलता आणि तत्परता महत्त्वाची असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन प्रत्येक घटनेत नागरिकांच्या मदतीला तत्पर राहते. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” जखमी प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंत्री महाजन यांच्या भेटीने दिलासा मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या दौऱ्यामुळे रुग्णालय प्रशासन अधिक सजग झाले असून, उपचारांचा वेग वाढला आहे.