नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या अॅक्सिओम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत. त्याआधी शुभांशू यांनी फुल ड्रेस फायनल रिहर्सल केली. यामध्ये त्यांनी असेंब्ली बिल्डिंगपासून रॉकेटमध्ये जाण्याची आणि त्यात बसण्याची प्रक्रिया समजून घेतली. यासंदर्भात शुभांशू म्हणाले की, क्षण तुम्हाला सांगतात की, तुम्ही स्वतःपेक्षा खूप मोठ्या असलेल्या गोष्टीचा भाग होणार आहात. मी खूप भाग्यवान आहे की, मला या मोहिमेचा भाग होण्याची संधी मिळाली.
हे ऐतिहासिक मिशन अॅक्सिओम स्पेसच्या ‘अॅक्सिओम-४’ मोहिमेअंतर्गत लाँच केले जाईल. ज्याला ‘मिशन आकाश गंगा’ असेही म्हटले जात आहे. हे खाजगी अंतराळ उड्डाण १० जून रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन सी २१३ अंतराळ यानाद्वारे लाँच केले जाईल. सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतरहे अंतराळ यान ११ जून रोजी रात्री १० वाजता आयएसएसशी जोडले जाईल. अॅक्सिओम मिशन ४ (अॅक्स-४) मध्ये, चार देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. १० जून २०२५ रोजी संध्याकाळी भारतीय वेळेनुसार ५:५४ वाजता या अभियानाला सुरू होईल. शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता.
अॅक्सिओम ४ मोहिमेच्या क्रूमध्ये भारत, पोलंड आणि हंगेरीतील सदस्यांचा समावेश आहे. १९७८ नंतर अंतराळात जाणारे स्लावोज उझनान्स्की हे पोलंडमधील दुसरे अंतराळवीर असतील. १९८० नंतर अंतराळात जाणारे टिबोर कापू हे हंगेरीचे दुसरे अंतराळवीर असतील. तर अमेरिकेच्या पेगी व्हिटसनची ही दुसरी व्यावसायिक मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे.