अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा ईमेल अज्ञात व्यक्तीकडून न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आला आहे. यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी त्वरीत कारवाई करत संपूर्ण न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवली आहे. पोलिस उपायुक्त सफीन हसन यांनी धमकीची पुष्टी करत सांगितले की, “आम्हाला गुजरात उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. हा ईमेलद्वारे मिळालेला इशारा गंभीर असून आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करत आहोत.”
धमकी मिळाल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉडला तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. संपूर्ण परिसरात कसून तपासणी करण्यात येत आहे. अद्याप या ईमेलमागील व्यक्तीची ओळख पटलेली नसली तरी पोलिसांकडून सायबर क्राइम युनिटच्या मदतीने तपास सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीवजा ईमेलमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशी देणे चुकीचे होते, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या ईमेलचा उद्देश आणि पार्श्वभूमी अधिकच संवेदनशील मानली जात आहे.
दरम्यान, न्यायालय आणि परिसरातील सर्व संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस फोर्स तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांत देशभरात शाळा, रुग्णालये, मेट्रो स्टेशन, विमानतळ यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या असून, सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच अलर्ट मोडवर आहेत. गुजरात उच्च न्यायालयातील ही घटना या मालिकेतीलच एक गंभीर भाग असल्याचे मानले जात आहे.