बीड : केज येथून कळंबकडे जाणाऱ्या धावत्या बसने आज ( दि. ९ ) दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ प्रवाशी बचावले.तर प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत तीन वृद्ध महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाल्या. काही वेळात अग्निशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, कळंब बस आगाराची बस (एमएच ११ बीएल ९३७४) केज येथून दुपारी ३:२० वाजण्याच्या दरम्यान २२ प्रवाशांना घेऊन कळंबकडे निघाली. बोबडेवाडी शिवारात चालकाच्या समोरच्या बाजूने बसने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्यास सांगितले.
बसमध्ये आग लागल्याचे समजताच सर्व प्रवाशांमध्ये बाहेर पडण्यासाठी एकच झुंबड उडाली. दरम्यान, या गोंधळात वयोवृद्ध ३ महिला किरकोळ जखमी झाल्या. केज व कळंब येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याप्रकरणी चालक अनिल बारकूल यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार निर्मला जाधव यांनी दिली. परिवहन अधिकाऱ्यांनी खाजगी वाहने तपासताना बसचीही नियमित तपासणी करावी. प्रवासास अयोग्य बसेसला रस्त्यावर येण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.