केंद्रीय मंत्रिमंडळातील ६० टक्के मंत्री मागासवर्गीय

0

मोदींनी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले ट्विट
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील ६० टक्के मंत्री हे अनुसूचित जाती (एसी) अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. मोदींना सत्तेत येऊन ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ट्विटरवर (एक्स) ही माहिती दिली. यासंदर्भात ट्विटरवर शेअर केलेल्या लिंकमधून पंतप्रधानांनी सध्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील ६० टक्के मंत्री हे एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातून आल्याचे म्हटले आहे. हे देशाच्या इतिहासात मंत्रिमंडळात या वंचित गटांचे सर्वाधिक प्रतिनिधित्व असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

काँग्रेससारख्या विरोधी पक्षांकडून सरकारवर या घटकांच्या हिताविरुद्ध काम करत असल्याचा आरोपावर मोदींनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील ट्विटमध्ये मोदी सरकारची ११ वर्षे हा सुवर्णकाळ असल्याचे म्हटले आहे. देशाला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने केवळ जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोपक्रम यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही महत्वाची कामगिरी केल्याचे म्हटले आहे. गुड गव्हर्नन्स आणि परिवर्तन यावर स्पष्ट लक्ष केंद्रित केले आहे. देशातील १४० कोटी नागरिकांच्या आशीर्वादाने आणि सामूहिक सहभागाने भारताने विविध क्षेत्रांत वेगवान परिवर्तन अनुभवले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या तत्त्वावर मार्गक्रमण करत एनडीए सरकारने वेग, प्रमाण आणि संवेदनशीलतेसह क्रांतिकारी बदल केले असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक प्रगतीपासून सामाजिक उत्थानापर्यंत, लोककेंद्रित आणि सर्वांगीण प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सामूहिक यशाचा आम्हाला अभिमान आहे, पण त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि विकसित भारत घडवण्याच्या नव्या निर्धाराने पुढे पाहतो आहोत. त्यांनी “११ वर्षे सेवा” हा हॅशटॅग वापरत वेगवेगळ्या क्षेत्रांत घडवलेल्या बदलांची माहिती देणाऱ्या लिंक शेअर केल्या.

मोदींनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, ‘भारत प्रथम’ हे प्रत्येक धोरणाचे आणि कृतीचे मार्गदर्शक तत्त्व राहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले. तसेच १५ कोटींहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाणी जोडण्या दिल्या. त्याचप्रमाणे गरीबांसाठी ४ कोटी घरे आणि १२ कोटी शौचालये बांधलीत. तसेच ६८ लाख स्ट्रीट व्हेंडर्सना कर्ज आणि ५२.५ कोटी छोटे उद्योजकांना कर्जे वितरीत केली. त्यासोबतच कोरोना साथरोगाच्या काळात २० कोटी महिलांना विविध योजनांतर्गत रोख मदत दिल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विट केले आहे. शाह म्हणाले की, मोदी सरकारचा ११ वर्षांचा कार्यकाळ हा “जनसेवा, संकल्प आणि समर्पणाचा सुवर्णकाळ” असल्याचे शाह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या नव्या भारताने ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’च्या बळावर आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल सुरू केली आहे.

मोदी सरकारच्या नेतृत्वात भारतातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत देशाला प्रत्येक क्षेत्रात क्रमांक १ बनविण्याचे लक्ष्य आहे. मोदींनी शेतकरी, महिला, मागासवर्गीय, दलित, वंचित घटक यांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवले.अमित शहा राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीतही मोदी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत सांगितले की, “नक्षलवाद संपत आलाय, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित झाली आहे. आता भारत दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना थेट त्यांच्या घरात घुसून कारवाई करतो. हे बदललेल्या भारताचे लक्षण आहे. शहा यांनी मोदी सरकारच्या पुढील कार्यकाळातही हीच गती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech