जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. जळगावात मागील दहा दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १०,००० रुपयांची वाढ झाली. तर आज चांदी दरात तब्बल २२०० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीने १,०८,००० प्रति किलो असा ऐतिहासिक टप्पा गाठला. दुसरीकडे सोन्यातही वाढ झाली असून यामुळे खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. यातच मागील दहा दिवसांत दहा हजार रूपयांनी चांदीची किंमत वाढली आहे. चांदीचा भाव प्रति किल एक लाख रूपयांवर पोहचला आहे. तर सोन्याची किंमत प्रति तोळा २०० रूपयांनी वाढून ९९ हजार रूपयांपर्यत पोहचली आहे. युनायटेड स्टेट्ससह अन्य देशांमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉर आणि जिओ-पॉलिटिकल तणावाचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे.