पैठणच्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात – शंभूराज देसाई

0

मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या शहराला अध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक तसेच पर्यटक देखील येत असतात. पैठणच्या पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधा तयार कराव्यात तसेच या आराखड्यातील कामे स्वदेश दर्शन योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात यावीत, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पैठण विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संदीपान भुमरे, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी विधानसभा सदस्य विलास भुमरे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, दूरदृश्यप्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभाग राजेंद्र बोरकर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पैठण हे सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. पैठण हे उत्कृष्ट पैठणीसाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच संत एकनाथ, ज्ञानेश्वर आणि चांगदेव महाराज संताचे निवासस्थान म्हणूनही या शहराला अध्यात्मिक महत्त्व आहे. या शहरात भाविक आणि पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात हे लक्षात घेऊन या भागाचा पर्यटन दृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक विकास होण्यासाठी सर्वसमावेशक पर्यटन आराखडा बनवावा प्रथम टप्प्यात स्वदेश दर्शन योजनेंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात यावीत, या भागाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पैठण येथील पायाभूत सुविधांचा विकास, घाटाचा विकास, भक्त निवास, स्थानिक संस्कृती, हस्तकलेचा प्रचार, संत एकनाथ मंदिर रोषणाई, जांभुल वन, दक्षिण काशी मैदान, आपेगाव विकास ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने करण्यासाठी पर्यटन विभागाने सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech