मुंबई : आज दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहेत, ते पाहून काळजाचं पाणी होतं. या अपघातात विमानातील दोन महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
ज्या परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला आहे. मी माझी सहवेदनाही व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सहभागी आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हटतात की, गुजरात सरकार, केंद्र आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना उत्तम उपचार मिळावेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
या अपघातामुळे अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात केवळ जीवितहानीच नव्हे, तर मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती, जी विझवण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.
या कठीण प्रसंगी आम्ही सगळे गुजरात शासनासोबत असून महाराष्ट्र शासन आवश्यक ती सर्व मदत करेल आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात देणं आवश्यक आहे. या दु:खद घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखावर मात करण्याची शक्ती लाभो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.