नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर बोईंग कंपनीची ड्रीमलायनर ही विमाने पुन्हा एकदा वादात सापडली आहेत. यामुळे डीजीसीएने पुन्हा एकदा या विमानांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक ड्रीमलायनर विमानाची विशेष तपासणी करणे बंधनकारक असणार आहे.
२०१३ मध्ये जपानमध्ये या विमानाचा अपघात झाल्यानंतर डीजीसीएने तीन महिने या विमानांचे उड्डाण थांबविले होते. यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा एकदा डीजीसीएने बोईंगच्या या वादग्रस्त विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक ड्रीमलायनर विमानाची विशेष तपासणी करणे बंधनकारक असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
डीजीसीएने उड्डाणापूर्वी अनेक महत्त्वाच्या तांत्रिक तपासण्यांचे निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग, केबिन एअर कॉम्प्रेसर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण चाचणी, इंजिन इंधन अॅक्च्युएटर ऑपरेशन, ऑइल सिस्टम आणि हायड्रॉलिक सिस्टमची तपासणी करावी लागणार आहे. टेकऑफपूर्वी पॅरामीटर्सचे योग्यरित्या पाहणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत सुरू ठेवण्यात यावी असेही डीजीसीएने म्हटले आहे. दोन आठवड्यांच्या आत पॉवर अॅश्युरन्स तपासणी देखील बंधनकारक केली आहे. तसेच गेल्या १५ दिवसांत बोईंग ड्रीमलाइनर विमानात आढळलेल्या समस्या आणि वारंवार येत असलेल्या बिघाडांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. हे बिघाड तातडीने दुरुस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.