इम्फाल : मणिपूर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी मणिपूरच्या इंम्फाल खोऱ्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. यामध्ये ३२५ स्वयंचलीत बंदुकांसह मोठ्या प्रमाणात हँडग्रेनेड आणि दारूगोळ्याचा समावेश असल्याची माहिती माहिती अतिरिक्त पोलीस महानिरीक्षणक लहरी दोरजी लहटू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुरक्षा दलांनी १३ व १४ जूनच्या मध्यरात्री इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांत ही धडक कारवाई करत स्फोटके आणि इतर शस्त्रसामग्री जप्त केली. यामध्ये १५१ एसएलआर रायफल्स, ६५ इन्सास रायफल्स, इतर प्रकारच्या ७३ रायफल्स, ५ कार्बाइन गन, २ एमपी-५ गन अशा एकूण ३२८ स्वयंचलीत बंदुकी आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे मणिपूर पोलीस आणि सुरक्षा दलांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असेही लहटू यांनी स्पष्ट केले.
भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली, २६ मे ते ५ जून दरम्यान मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने कांगपोक्पी, थौबल, काकचिंग, तेंग्नौपाल, बिष्णुपूर, जिरीबाम, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम या डोंगरी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणांवर आधारित ऑपरेशन्स सुरू केल्या, असे एका निवेदनात म्हटले आहे. या ऑपरेशन्समध्ये 23 फुटीरवाद्यांना अटक करण्यात आली आहे.