बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, उदय सामंतांची शिष्टाई

0

मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा

अमरावती : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत ७ दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर २ ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू गत ७ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यांनी परवापासून थेट अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर २ ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू.

मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना २ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचे यश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech