सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील विविध आगारांतून पाच हजार ३०० एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यात सोलापूर विभागामधून २५० अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध असणार असल्याची माहिती येथील आगार प्रशासनाने दिली. राज्यासह कर्नाटक, आंध्र व तेलंगणासह परराज्यातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी येतात. याही वर्षीच्या आषाढीच्या निमित्ताने लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या मोठ्या एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अन्य जिल्ह्यातून येणार्या भाविकांची संख्या जास्त असते.
या भाविकांना प्रवासाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व अतिरिक्त बससेवेच्या वाहतुकीचे नियोजन एसटीने केले आहे. पंढरपूरच्या मुख्य बसस्थानकांतून वाढीव वाहतुकीची सोय केली आहे.आषाढी वारीच्या धर्तीवर एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठी सवलतीतील तिकिटाचे दर जाहीर केले आहेत. ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, ६५ वर्षांच्या पुढील नागरिकांना अर्धे तिकीट आणि महिलांना ५० टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत योजना बंद केल्याने वारकरी एसटीला पसंती देताना दिसत आहेत.