मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटासाठी तर ही राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे. यासाठीच ठाकरे गटाकडून विधानसभा निहाय निरीक्षक नेमून नियोजनबद्ध बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकीद्वारे स्थानिक पातळीवरील संघटन बांधणी, निवडणूक रणनीती, उमेदवार निवड प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यावर भर दिला जात आहे. एकूणच शागा प्रमुखांना कामाला लागा, असे आदेश ठाकरेंनी दिले आहेत.
मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश जारी केल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः उपस्थित राहून थेट मार्गदर्शन केले. याआधी निरीक्षकांमार्फत गटनिहाय संवाद साधण्यात आला होता. मात्र आता ठाकरे यांनी स्वतः मैदानात उतरत, शाखा प्रमुखांना एकत्रित संबोधित करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मुंबईतील विविध वॉर्डातील परिस्थिती, स्थानिक नेतृत्वाची ताकद, तसेच गेल्या काही वर्षांतील घडामोडींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
ठाकरे म्हणाले की, दोन व्यापाऱ्यांना आणि भाजपला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहे, उद्धव ठाकरे आणि आपल्या पक्षाला संपवून त्यांना महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे पण त्याच्यामध्ये आपण आहोत. मुंबई आपली आई आहे ती विकू देऊ नका. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडलं, तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली. ती मुंबई व्यापाऱ्यांच्या हातात जाऊ द्यायची नाही, असं म्हणत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उध्दव ठाकरेंनी दिल्या आहेत.
सात वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. पुनःश्च एकदा मुंबई महानगरपालिकेवर आपला भगवा फडकविण्याच्या इर्षेने आपण कामाला लागायचे आहे. त्यासाठी संघटना बांधणी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक शाखेतील शाखाप्रमुख ते गटप्रमुख आणि पोलिंग एजंट पर्यंतची कार्यकारिणी सदृढ, कार्यक्षम आणि अभ्यासू असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत शाखा प्रमुख हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. शाखाप्रमुख हे वॉर्डनिहाय असतात. त्याशिवाय, शाखाप्रमुखांचा स्थानिक पातळीवरील अनेक मुद्द्यात हस्तक्षेप असतो. स्थानिक जनतेमध्ये त्यांचा थेट संपर्क असतो. महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासाठी शाखाप्रमुखच महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. मात्र, स्थानिक पातळीवरील बहुतांशी शाखाप्रमुख हे ठाकरेंसोबत राहिले. आता, याच संघटनात्मक आधारावर ठाकरे मुंबई महापालिकेचे मैदान मारण्यासाठी प्रयत्नशील आहेत.