राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

0

पुण्यातील कोंढवा धावडे ऊत्तमनगर पुल तसेच , जळगाव, नाशिक, हिंगोली, वर्धा जिल्ह्यांतील पुलांच्या धोकादायक स्थितीची गंभीर दखल

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या दुर्दैवी पुल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले व काहीजण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र लिहून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, संबंधित पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला असतानाही काम न झाल्याने ही दुर्घटना घडली असून यासंदर्भात चौकशी करण्यात यावी. डॉ. गोऱ्हे यांनी केवळ कुंडमळा पुलच नव्हे तर राज्यातील इतर धोकादायक पुलांचीही माहिती देत त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

खडकवासला धरण पायथ्याजवळील कोंढवे धावडे ते उत्तमनगर या रस्त्यावरचा पुल देखील धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे त्याचबरोबर, जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील बांभोरी पुल, नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील पुल, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मार्गावरील कयाधू नदीवरील पुल, वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील तांबा गावाजवळील पुल ही देखील धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत या सर्व पुलांची तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकतेनुसार नवीन पुलांचे बांधकाम अथवा दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची शिफारस केली आहे. याबरोबरच त्यांनी विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर तसेच संबंधित जिल्हाधिकारी पुणे, वर्धा, हिंगोली, नाशिक व जळगाव यांना या बाबत तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचना देण्याची शिफारस देखील केली आहे.

राज्यातील नागरिकांचा जीव धोक्यात न येण्यासाठी व भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी धोरणात्मक व प्रभावी निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत महत्त्वाची असून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech