पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

0

जळगाव : “माझ्यासह माझी मुलेही याच शाळेत शिकलेली आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो. शाळेचा पहिला दिवस फक्त वह्या-पुस्तकांचा नसतो, तर तो नव्या स्वप्नांचा शुभारंभ असतो. मुलांनो, खेळा, हसा, शिका आणि उंच भरारी घ्या. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ती संस्कारांची पाठशाळाही आहे. शिक्षक, पालक आणि अधिकारी यांनी समन्वयाने मुलांमध्ये विश्वास व स्वाभिमान रुजवायला हवा. मी बैलगाडीतून आलो कारण शिक्षणाच्या प्रवासाला मातीचा गंध असतो… आणि त्या गंधातच खरी समृद्धी असते,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, पाळधी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी उपस्थितीने एक वेगळीच शैक्षणिक आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कोरली.

इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खुद्द पालकमंत्र्यांनी बैलगाडी चालवत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत मिरवणूक काढली. त्यांनी जुन्या शाळेतील आठवणींना स्नेहपूर्वक उजाळा दिला. पुष्पवृष्टीत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात हात घालून शाळेत प्रवेश केला. शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केले, हे विशेष!

या शाळा प्रवेशोत्सवाचे ठळक वैशिष्ट्ये
बैलगाडीतून आगमन – शिक्षणाच्या प्रवासाला ग्रामीण मातीचा गंध देणारा अनोखा उपक्रम
पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट, दप्तर, गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत
पालकमंत्री तब्बल दोन तास विद्यार्थ्यांमध्ये रमले – जीवनदृष्टीचे बळ दिले
पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन – विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नव्या पर्वाला सुरुवात
पालकमंत्र्यांतर्फे दीड लाख वह्यांच्या वितरणाचा – औपचारिक शुभारंभ

गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित होत असलेले बदल व त्या अनुषंगाने असलेली जबाबदारी यांची जाणीव करून दिली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नवीन सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू झालेला असून, ही शाळा एक मॉडेल शाळा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech