नागपूर : नागपूरच्या भीलगाव येथील अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीच्या युनिटमध्ये आज, मंगळवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, ६ जण जखमी झाले आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार कंपनीच्या ग्लास-लाइन्ड रिएक्टरमध्ये सकाळी ११ वाजता अचानक स्फोट होऊन मोठा आगीचा भडका उडाला. या घटनेत एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना कामठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मायक्रोक्रिस्टलाइन सेलुलोज (एमसीसी) तयार करते. एमसीसी औषधनिर्मिती आणि खाद्य उद्योगात वापरली जाते. या कंपनीचे उत्पादन मुख्यतः औषधांच्या आणि खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला असून, ‘ग्लास-लाइन्ड रिएक्टर’मध्ये कोणत्या कारणामुळे स्फोट झाला याचा शोध घेत आहेत. कंपनीतील सुरक्षा उपायांचीही तपासणी केली जात आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक तपासानुसार, स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाने जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.