नाशिक : नाशिकच्या विकासासाठी हातात हात घालून काम करण्याचा निर्धार देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांनी व्यक्त केला. नाशिकला डिफेन्स हब बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या अनुषंगाने नाशिकच्या विकासात उद्योग आणि संरक्षण क्षेत्र संयुक्तरित्या कसे योगदान देऊ शकते याबाबत चर्चा करण्यासाठी देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडट, लेफ्टनंट जनरल एस.एन.सरना यांनी निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि त्यांच्या कमिटीला आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्यात नाशिकच्या विकासाबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर उभयतांनी वरील प्रमाणे निर्धार व्यक्त केला.
आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक चे उद्योगविभाग आणि संरक्षण क्षेत्राला व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. संरक्षण विभागातर्फे सुटे भाग उपलब्ध झाल्यास नाशिकचे उद्योजक या संधीचे सोने करून देशाच्या विकासात आपले बहुमूल्य योगदान देऊ शकतील असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले.
भारतीय सेना हे शौर्याचे प्रतीक आहे. भारताला विश्वगुरु बनवयाचे असेल तर सेने बरोबर प्रत्येक नागरिकाने देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. नाशिकच्या विकासासाठी उद्योग आणि संरक्षण क्षेत्र यांच्यातील समन्वय मोलाचे आहे. यांच्यातील संवाद कायम राहिला पाहिजे. आम्ही निमाच्या संपर्कात राहू असे लेफ्टनंट जनरल सरना यांनी यावेळी निदर्शनास आणले. जनकल्याणासाठी संरक्षण विभाग सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. चर्चेत निमाचे उपाध्यक्ष के.एल.राठी, मनीष रावल,सचिव राजेंद्र अहिरे,सचिन कंकरेज, मिलिंद राजपूत, सागर मटाले व रूपेश पाटील यांनीही सहभाग घेतला.