नाशिक : विविध मागण्य़ासाठी नाशिकच्य़ा आदिवासी आयुक्त कार्यालयावर धडकलेला बिऱ्हाड मोर्चा अदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या आश्वासनानंतर माघारी परतला. नव्या सुधारित आकृतीबंधात रद्द झालेली वर्ग-४ ची पदे पुन्हा निर्माण करावी, वर्ग-३ आणि वर्ग-४ चे रोजंदारीवर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे विनाअट समायोजन होईपर्यंत मागील सत्रात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजंदारी पध्दतीनेच आदेश देण्यात यावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचारी संघटनेने काढलेला बिऱ्हाड मोर्चा मंगळवार दि. १७ जून रोजी रात्री उशीरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कर्मचारी संघटनेच्या वतीने चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा ते आदिवासी आयुक्त कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील वर्ग-३ आणि वर्ग-४ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत २१ मे रोजी बाह्यस्त्रोताद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. तो निर्णय रद्द करण्याबरोबरच इतरही मागण्या बैठकीत मान्य न झाल्याने संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चा आडगाव येथील ट्रक टर्मिनलजवळ आला असता आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेत आवाहन करुनही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
दरम्यान, जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महाजन यांनी आंदोलनकर्त्यांना पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करुन मागील सत्रात हजर असलेल्यांना कामावर रुजू करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून बुधवार दि. १८ जूनपासून आंदोलनकर्ते घरी परतण्यास सुरूवात झाली आहे.