लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. लीड्सच्या हेडिग्ले क्रिकेट मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आला तेव्हापासून विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर तमाम क्रिकेटप्रेमींना मिळालं आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल भारतासाठी आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. उपकर्णधार ऋषभ पंत याने पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगलाच कस लागणार आहे. एक कर्णधार आणि एक फलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागणार आहेत. विराट कोहलीनंतर आता भारतीय संघात महत्त्वाच्या अशा चौथ्या क्रमांकावर तो आता फलंदाजीला येणार आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा ही आता शुभमन गिलवरच असणार आहे. भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये ३३ वर्षांपासून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार याची समस्या कधी भेडसावलीच नाही. कारण सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या फलंदाजांनी कायमच भारतासाठी या क्रमांकावर फलंदाजीला येत आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका बाजवली आहे. सचिन तेंडुलकरने १७७ कसोटी सामन्यात ५४.४२ च्या सरासरीने १३४९२ धावा केल्या आहेत. यामध्ये ४४ शतके आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराट कोहलीने ५०.०९ च्या सरासरीने ७५६४ धावा केल्या होत्या. यामध्ये २६ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.