हिंदी सक्तीच्या वादामागे राज ठाकरे – फडणवीसांचे साटेलोटे – नाना पटोले

0

मुंबई : राज्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन आदेश कशा आला ? यामागे एक षडयंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी सर्वबाजूने केली जात आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची मागणी ही होत आहे. बेरोजगारी व महागाई प्रचंड आहे. जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. आणि सरकारकडे पैसेही नाहीत व त्यावर उत्तरही देता नाही यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आला आहे. यामागे राजकारण असून फडणवीस व राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी शिक्षण व भाषा याबद्दल काहीही देणेघेणे नाही. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका कधीही होऊ शकतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चव्हाट्यावर आणला आहे. या दोघांनाही यातून राजकीय पोळी भाजायची आहे, असे नाना पटोले म्हणाले.

मराठी भाषा संस्कृती जपलीच पाहिजे, पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदीचे ओझे नसावेच याबाबत दुमत नाही. पण हिंदी भाषेचा वाद हा शैक्षणिक मुद्दा न करता त्याला राजकीय स्वरुप देण्यात आले आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी पहिलीपासून हिंदी अनिवार्य करणार नाही असे सांगितले पण मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेताच वादग्रस्त जी आर कसा निघाला ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतविभाजन करून त्याचा फायदा भाजपा व मनसेला व्हावा हा यामागे हेतू असून मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर असा प्रकार आहे, असेही पटोले म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech