पाटणा : विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गतसर्व वृद्ध, दिव्यांग आणि विधवा महिलांना आता दरमहा ४०० रुपयांऐवजी ११०० रुपये पेन्शन मिळणार आहे. जुलै महिन्यापासून सर्व लाभार्थ्यांना वाढीव दराने पेन्शन मिळेल. नितीश कुमार म्हणाले की, ही रक्कम दर महिन्याच्या १० तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाईल. १ कोटी ९ लाख ६९ हजार २५५ लाभार्थ्यांना यामुळे खूप मदत होईल असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले आहे.
वृद्ध हे समाजाचा एक मौल्यवान भाग आहेत आणि त्यांचे सन्माननीय जीवन सुनिश्चित करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. राज्य सरकार या दिशेने काम करत राहील. निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी राज्यातील महिलांना यानित्ताने एक मोठी भेट दिली आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, त्यांच्या या घोषणेकडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीकोनातूनच पाहिले जात आहे.