अमरावती : अमरावतीचे भूमीपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे २४ किंवा २५ जूनला विशेष विमानाने विदर्भात येऊ शकतात. त्यांचा अमरावती दौरा हवामान पाहून ठरवला जाईल. २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता कठोरा रोड येथील पोटे कॉलेज ग्रुपच्या स्वामी विवेकानंद सभागृहात हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा बार असोसिएशनमध्ये या कार्यक्रमामुळे उत्साह संचारला आहे. सरन्यायाधीशांची रक्ततुला करण्यासाठी बार असोसिएशनकडून रक्तदान शिबिर घेतले जात आहे. यात महिला वकिलांसह तरुणांमध्ये रक्तदानासाठी खूप उत्साह दिसून येत आहे.
सरन्यायाधीश गवई यांचे स्वागत नेत्रदीपक असेल, असे नियोजन केले जात आहे. २५ जूनला पोटे कॉलेजच्या विवेकानंद सभागृहात होणाऱ्या ऐतिहासिक सत्काराला उच्च न्यायालयाचे तीन वरिष्ठ न्यायाधीशही उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्या. प्रवीण पाटील, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगडा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाचे पालक सदस्य अॅड. देशमुख बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवाचे पालक सदस्य अॅड. परिजात पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सरन्यायाधीशांना झेड सुरक्षा : सरन्यायाधीशांसाठी झेड सुरक्षा असून त्या संदर्भात जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यात विशेष चर्चा होणार आहे. सर्व प्रकारची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात सर्वजण व्यग्र आहेत. सरन्यायाधीशांचा जीवनप्रवास दाखविणाऱ्या व्हिडिओ क्लिप देखील तयार करण्यात आलेल्या आहेत.
विशेष सन्मानचिन्ह : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सन्मानार्थ विशेष सन्मानचिन्ह वकील संघाच्यातर्फे देण्यात येणार आहे. नागरी सत्कार भव्य दिव्य होणार असून वकील संघाचे पदाधिकारी सदस्य ऐतिहासिक सत्कार सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता कार्यरत आहेत. यामध्ये अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, उपाध्यक्ष अॅड. आशिष लांडे, सचिव अमोल मुरल, ग्रंथालय सचिव अॅड. विद्या मानके, कार्यकारणी सदस्य अॅड. ऋषिकेश उपाध्ये, सुमित शर्मा, अॅड. अक्षय बोले, नेतल मल्ला, आशिष सिंह परिहार, विशाखा तागडे पाटील, पूनम रिठे यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य सोहळ्याच्या यशस्वी करिता परिश्रम घेत आहेत.