“अशांत जगाला योगातून शांतता मिळू शकेल”- पंतप्रधान

0

विशाखापट्टनम : वर्तमानात जगाला तणाव, अशांतता आणि अस्थिरतेने ग्रासले आहे. या अशांततेच्या वातावरणात जगाला योगातून शांततेची दिशा मिळू शकेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज, शनिवारी आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टनम येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही सहभाग नोंदवला.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, अशांतता आणि तणावाच्या वातावरणात जगाची वाटचाल सुरू आहे. अनेक देशांमध्ये अस्थिरता वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत योग शांततेचा मार्ग दाखवू शकतो. योग मानवाला श्वास घेण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि पुन्हा नव्या दमाने पुढे जाण्यासाठी क्षणभर विश्रांती प्राप्त करून देतो. योगचा साधा अर्थ होतो जोडले जाणे. योगाने संपूर्ण विश्वाला एका सूत्रात जोडल्याचे चित्र असून ते फार सुखावह आहे. संयुक्त राष्ट्रात जेव्हा भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा, असा प्रस्ताव मांडला तेव्हा कमीत कमी वेळात १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. या प्रस्तावासाठी झालेली एकजूट ही काही सामान्य घटना नव्हती. हा फक्त एका प्रस्तावाला समर्थन देण्याचा विषय नव्हता, तर मानवतेसाठी केलेला हा एक सामूहिक प्रयत्न होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.

आजघडीला दिव्यांग बांधव ब्रेल लिपीत योगशास्त्राचे अध्ययन करतात, शास्त्रज्ञ अंतराळात योगाचे सराव करतात, तरुण मित्र गावागावांत योग ऑलिंपियाडमध्ये सहभागी होतात. नौदलाच्या सर्व जहाजांवर अप्रतिम योग सत्रांचे आयोजन झाले आहे. ओपेरा हाऊसच्या पायऱ्यांपासून ते एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत आणि विशाल समुद्रापर्यंत एकच संदेश आहे की, योग सर्वांसाठी आहे. सर्व सीमा आणि क्षमतेच्या पलीकडे योग आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी योगाचे महत्व विशद केले.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ अशी आहे. याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, या वर्षीची थीम एक मौल्यवान सत्य सांगते. पृथ्वीवरील प्रत्येक घटकाचे आरोग्य परस्परांशी निगडित आहे. माणसांचे आरोग्य त्या मातीवर अवलंबून आहे जिथे अन्न तयार होते, त्या नद्यांवर जे आपल्याला पाणी पुरवतात, त्या प्राण्यांवर जे आपल्यासोबत परिसंस्थेत राहतात आणि त्या वनस्पतींवर ज्या आपल्याला पोषण देतात. योग आपल्याला या परस्परसंबंधांची जाणीव करून देतो, आपल्याला जगाशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो आणि शिकवतो की आपण स्वतंत्र व्यक्ती नाही, तर निसर्गाचा भाग आहोत असे मोदी म्हणाले.

जगात योगाचा प्रसार करण्यासाठी, भारत आधुनिक संशोधनाद्वारे योगशास्त्राला अधिक बळकटी देत ​​आहे. देशातील मोठ्या वैद्यकीय संस्था योगावर संशोधन करत आहेत. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेत योगाच्या वैज्ञानिक पैलूमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मानवतेसाठी योगाची सुरुवात करा. हा दिवस आंतरिक शांती ही एक जागतिक धोरण बनू दे, जिथे योग केवळ वैयक्तिक सराव म्हणून नव्हे तर जागतिक भागीदारी आणि एकतेसाठी एक शक्तिशाली साधन म्हणून स्वीकारला जाईल. प्रत्येक देश आणि प्रत्येक समाजाने योगाला एक सामायिक जबाबदारी बनवावी आणि सामूहिक कल्याणासाठी एक सामान्य योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech