पाकिस्तानकडून ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

0

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव पुढे केले आहे. भारत-पाक संघर्षादरम्यान ट्रम्प यांच्या राजनैतिक पुढाकार आणि मध्यस्थीमुळे मोठे युद्ध टाळण्यास मदत झाली असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत विचरले असता त्यांनी “मला शांततेचा नोबेल पुरस्कार चार-पाच वेळा मिळायला हवा होता. ” पण ते मला नोबेल शांतता पुरस्कार देणार नाहीत कारण ते फक्त उदारमतवाद्यांना देतात.” अशी प्रतिक्रीया दिली आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी दोन्ही देशांशी चर्चा करून युद्धबंदीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील युद्धाची शक्यता टळली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणात स्पष्टपणे सांगितले होते की, भारत-पाकिस्तान युद्धबंदीमध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. त्यांनी असेही म्हटले होते की, भारत कधीही कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये बंद दाराआड बुधवारी बैठक घेतली. दोघांनीही व्हाईट हाऊसच्या कॅबिनेट रूममध्ये एकत्र जेवण केले. एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech