वशिंग्टन डीसी : १३ जूनपासून सुरू झालेल्या इस्रायल आणि इराणमधील तणावात आता अमेरिकने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर बॉम्बहल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अणुस्थळांना लक्ष्य केले आहे. इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित केले आहे.
यादरम्यान त्यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धाबद्दल भाष्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत आणि सुरक्षितपणे माघारी परतत आहेत. बहुतेक बॉम्ब फोर्डो या ठिकाणी टाकण्यात आले होते.” त्यांनी अमेरिकन सैन्याचे कौतुक केले आणि म्हटले की, “आमच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही.” इराण गेल्या ४० वर्षांपासून अमेरिकेच्या विरोधात आहे आणि अनेक अमेरिकन या द्वेषाला बळी पडले आहेत. आता हे घडणार नाही. इराणमुळे हजारो अमेरिकन आणि इस्रायली नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. पण एवढेच पुरे झाले, आता हे आता घडणार नाही. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा उद्देश अणुधोका कायमचा संपवणे हा होता. म्हणूनच अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य केलेअसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.