लंडन : लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतचे शतक आणि जसप्रीत बुमराहचे सामन्यात तीन बळी हेच भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरले. इंग्लंडने कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर तीन बाद २०९ धावा केल्या आहेत. इंग्लिश संघ भारताच्या २६२ धावांनी पिछाडीवर आहे. ऑईली पोप १०० धावांवर आणि हॅरी ब्रुक शून्यावर नाबाद खेळत आहेत. भारताला पहिल्या डावात ऋषभ पंत, कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या जोरावर ४७१ धावाच करता आल्या. भारताने ३ विकेट गमावून दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २३० धावा केल्या होत्या. मात्र, केवळ ४१ धावात भारताचे ७ फलंदाज बाद झाले.
भारतीय संघाला ६०० धावांपर्यंत पहिल्या डावात मजल मारता आली नाही. गोलंदाजी जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद केले. बुमराह वगळता भारताच्या एकाही गोलंदाजाला सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. टीम इंडियाच्या सुमार गोलंदाजीला साथ मिळाली ती खराब क्षेत्ररक्षणाची. यशस्वी जयस्वाल आणि रविंद्र जाडेजाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला. आता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ इंग्लंडच्या फलदाजांना रोखणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.