निवडणूक आयोग लवकरच जारी करणार वेळापत्रक
मुंबई : राज्यात आगामी ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होतील. या निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक जारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ४ टप्प्यांमध्ये होणार आहेत. ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, आदींच्या निवडणुका कोरोना संसर्गा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावरसुद्धा बराच गदारोळ झाला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर न राज्यात कुठे एकदा तर कुठे दोनदा, तीनदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती. पण, या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषद, महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ६ मे २०२५ रोजी निर्णय दिला. ओबीसींना २०२२ पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला ४ महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. निवडणुकांसदर्भातील अधिसूचना ४ आठवड्यांत काढण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.