मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजात केंद्र सरकारच्या सायबर क्राइमविरोधी जनजागृती मोहीमेसाठी तयार केलेली कॉलर ट्यून देशभरात वाजत आहे.या कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ नागरिकांना सायबर फ्रॉडपासून सावध राहण्याचे आवाहन करतात. मात्र, ही कॉलर ट्यून अनेकांना त्रासदायक वाटत असल्याने काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर बच्चन यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बिग बींनी मजेशीर उत्तर दिलं आहे.
एका युजरने एक्सवर लिहिले, “फोन उचलण्याआधी फक्त बच्चनसाहेबांचा आवाज ऐकू येतो. कंटाळा आला आहे आता.” यावर अमिताभ बच्चन यांनी सौम्य पण रोखठोक उत्तर देत स्पष्ट केलं, “सरकारच्या सांगण्यावरून मी हे केलं आहे. मला सांगण्यात आलं, म्हणून मी केलं. आता तुम्हाला त्रास होत असेल, तर सरकारला जा आणि सांगा.” अशाप्रकारे बिग बींच्या उत्तराने नेटकऱ्याची बोलती बंद झाली. अमिताभ बच्चन यांच्यावर “बुद्धा सठिया गया है” अशीही एक टिका करण्यात आली होती.
यावर त्यांनी अत्यंत शांत आणि ठामपणे उत्तर देत लिहिलं, “हे बोलणं अत्यंत असंवेदनशील आहे. पण काळच असा असतो. जो वयोमानाने वृद्ध होतो, तोच खरा ज्ञानी असतो. आणि देव करो, तुम्ही सुद्धा पुढे वयस्कर व्हाल” तर अनेकांनी बच्चन यांना समर्थन दिलं असून, सरकारच्या सामाजिक मोहीमेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं आहे. काहींनी मात्र ही कॉलर ट्यून हटवावी, अशी मागणी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. सध्या भारतात अनेक नागरिक सायबर फ्रॉडच्या झळा सहन करत असल्याने सरकार अशा प्रकारे जनतेला जागरूक करत आहे. अमिताभ बच्चन यांनी यासाठी आपला आवाज दिला असून, त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यांनी अत्यंत समजूतदारपणाने आणि जबाबदारीने उत्तर दिलं आहे.