पुणे/मुंबई : राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात, अशी प्रार्थना पांडुरंग चरणी करतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सहभाग घेत सावळ्या विठ्ठलाचे नामस्मरण केले. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सहभागी होत वरवंड गावापर्यंत ते सहकाऱ्यांसह पायी चालले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वारकरी संप्रदायाने समता, बंधुता, सामाजिक न्याय आदी मुल्यांची पेरणी करत समतेचा मोठा संदेश समाजाला देऊन अध्यात्मिक क्रांती घडवली आहे. भारताचा स्वातंत्र्य संग्रामही याच विचाराने प्रभावित होता आणि स्वांतत्र्यानंतर देशाच्या संविधानामध्येही हाच विचार संमिलीत झालेला आहे. पुढे याच विचारावर महाराष्ट्र धर्म स्थापन झाला. आज महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल तर वारीत सहभागी होणे, संतसाहित्य, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, हे अनुभवावे यासाठी काँग्रेसजण या पालखीत सहभागी झाले आहेत. देशात समाजवाद व बंधुत्व यांचे संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे ही आमची अभिलाषा आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. या पालखी सोहळ्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, अजय छाजेड, प्रवक्ते गोपाल तिवारी, प्रकाश सोनावणे, अमर खानापुरे, श्रीरंग बर्गे, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.